अश्विनचे ​​ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘शतक’, असे करणारा दुसरा गोलंदाज ठरला


भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये गणला जातो. जेव्हा तो मैदानात उतरतो, तेव्हा तो काही ना काही विक्रम करतो. सध्या अश्विन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळत असून या सामन्यातही त्याने एक विक्रम केला आणि शतक झळकावले.

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट्सचे शतक केले आहे. त्याने दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी पूर्ण केले आहेत. यासह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 100 विकेट्स पूर्ण करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 डावात विकेट्सचे शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने सहा वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. 103 धावांत सात बळी ही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी आहे.

या सामन्यात अश्विनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी केली आहे. या ऑफस्पिनरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 700 बळी पूर्ण केले आहेत. अश्विनने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात 21 षटकात 57 धावांत तीन बळी घेतले.