लादेन, अल जवाहिरी… आता सैफ अल-अदेल, जाणून घ्या कोण आहे अल कायदाचा नवा म्होरक्या


अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने आपला नवा नेता म्हणून सैफ अल-अदेलची निवड केली आहे. आता अमेरिकेनेही संयुक्त राष्ट्राने केलेल्या दाव्याला मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी म्हटले आहे की, अल कायदाबाबतचा त्यांचा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या दाव्यांसारखाच आहे आणि सैफ अल-अदेलला या संघटनेचा नेता करण्यात आले आहे.

अदेल हा इजिप्शियन असून तो सध्या इराणमध्ये असलेल्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करत आहे. अयमान अल-जवाहिरीची गेल्या वर्षी जुलैमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हत्या करण्यात आली होती. सैफ अल-अदेलची देखील अल-कायदाच्या दहशतवाद्यांमध्ये गणना केली जाते आणि त्याने आतापर्यंत अनेक मोठे हल्ले घडवले आहेत.

सैफ अल-अदेल आणि अल जवाहिरी यांच्याशी संबंधित पाच मोठ्या गोष्टी-

1- अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर, अल कायदाने अद्याप आपल्या नेत्याची औपचारिक घोषणा केलेली नाही. अफगाणिस्तानातील तालिबानी अधिकारीही यामुळे चिंतेत आहेत.

2- संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, अल-कायदा प्रमुख अल जवाहिरी गेल्या वर्षी जुलैमध्ये काबूलमधील एका घरावर अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात मारला गेला होता.

3- संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार अल-कायदा इराणमध्ये राहणाऱ्या सैफ-अल-अदेलच्या मुद्द्यावर अतिशय संवेदनशील आहे. यामुळेच तो अदेलच्या नावाची औपचारिक घोषणा करत नाही.

4- अल-कायदाचा दहशतवादी अदेल (62) हा देखील इजिप्तच्या स्पेशल फोर्सचा माजी लेफ्टनंट कर्नल राहिला आहे. अदेल हा अल-कायदाचा जुना रक्षक म्हणून गणला जातो.

5- सैफ अल अदेलने संघटनेची ऑपरेशनल क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या काही दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले आहे. सैफ अल-अदेल 2002 किंवा 2003 पासून इराणमध्ये राहत आहे.