4 षटकात 5 विकेट, 20 वर्षीय वेगवान गोलंदाजाचा कहर, 6 षटकार ठोकणाऱ्याला 1 चेंडूत केले गार


पाकिस्तानातील टी-20 टूर्नामेंट पाकिस्तान सुपर लीगची जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांतील शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावापर्यंतचा थरारक सामना पाहिल्यानंतर तिसरा सामना एकतर्फी पद्धतीने संपला आणि त्याला कारण ठरला तो 20 वर्षीय वेगवान गोलंदाज, ज्याने निम्मा संघ गारद केला.

मुलतान सुलतानने बुधवार, 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सचा 9 गडी राखून सहज पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना मुलतानने क्वेटाला केवळ 110 धावांत गुंडाळले आणि नंतर 14 व्या षटकात केवळ 1 गडी गमावून सहज विजय मिळवला.

मुलतानचा 20 वर्षीय वेगवान गोलंदाज इहसानुल्ला याने क्वेटाची फार वाईट अवस्था केली. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या 4 षटकात केवळ 12 धावा दिल्या आणि अर्ध्या संघाला म्हणजेच 5 फलंदाजांना आपले बळी बनवले.

10 दिवसांपूर्वी पीएसएलच्या प्रदर्शनीय सामन्यात वहाब रियाझला सलग 6 षटकार ठोकणारा स्फोटक फलंदाज इफ्तिखार अहमदही इहसानुल्लाहचा बळी ठरला. इफ्तिखार गोल्डन डक ठरला म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

मुलतानने छोटे लक्ष्यही अवघड होऊ दिले नाही आणि रिले रुसोच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 13.3 षटकांत विजय मिळवला. रुसोने 42 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या.