या भारतीय महिला खेळाडूकडे नव्हते स्वतःचे घर, आता WPL लिलावात तिला मिळाले 1.90 कोटी


WPL 2023 च्या लिलावात टीम इंडियाची विकेटकीपर रिचा घोषचे नशीब खुलले. आरसीबीने भारताच्या या यष्टीरक्षकाला 1.90 कोटी रुपयांना खरेदी केले. रिचा घोषची मूळ किंमत 50 लाख होती आणि तिला चौपट रक्कम मिळाली. WPL मध्‍ये 1.90 कोटी मिळविल्‍यानंतर रिचा घोषने मोठे भावनिक विधान केले आहे. या पैशातून ती तिच्या आई-वडिलांसाठी घर खरेदी करणार असल्याचे रिचा घोषने सांगितले.

WPL 2023 च्या लिलावानंतर ऋचा घोष म्हणाली, मला कोलकात्यात फ्लॅट घ्यायचा आहे. मला माझे वडील आणि आईसोबत त्यात राहायचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे, त्यांनी खूप संघर्ष केला आहे.

रिचा घोषने सांगितले की तिचे वडील अंपायरिंग करून घरखर्च चालवतात. रिचाने सांगितले की, लिलावानंतर तिला आशा आहे की तिच्या वडिलांना इतके कष्ट करावे लागणार नाहीत.

रिचा घोष ही भारताची पुढची सुपरस्टार क्रिकेटर मानली जाते. ही यष्टिरक्षक फलंदाज तिच्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. रिचाने आतापर्यंत 26 टी-20 डावात 458 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 135 पेक्षा जास्त आहे.

रिचा घोष टी-20 संघाची फिनिशर मानली जाते. T20 विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऋचाने पाकिस्तानविरुद्ध 20 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी करत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला.