पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघात उडाली खळबळ, डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर?


भारताकडून झालेल्या दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे. नागपुरातील डाव आणि 132 धावांच्या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियन संघ दिल्ली कसोटीसाठी मोठा बदल करण्याच्या मूडमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलिया आपला अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणार आहे. डेव्हिड वॉर्नर नागपूर कसोटीच्या दोन्ही डावात फ्लॉप ठरला होता. पहिल्या डावात त्याला फक्त 1 धावा करता आल्या तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून फक्त 10 धावा निघाल्या. त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि आता नागपुरातील त्याच्या खराब कामगिरीने आगीत आणखीच तेल टाकायचे काम केले आहे.

द एज वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कसोटीतून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही हेडला बेंचवर बसवण्यात आले, त्यानंतर टीम मॅनेजमेंटवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

आता फक्त एका सामन्यानंतर वॉर्नरला बाहेर करण्याची चर्चा का होत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरंतर या खेळाडूचा टीम इंडियाविरुद्धचा कसोटी रेकॉर्ड खूपच खराब आहे. ऑस्ट्रेलिया असो वा भारत, दोन्ही ठिकाणी तो स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. भारतात वॉर्नरने 9 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 22.16 च्या सरासरीने केवळ 399 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध त्याची एकूण कसोटी सरासरी 32.19 आहे. सलामीवीरासाठी अशी कामगिरी असह्य मानली जाते. त्यामुळेच वॉर्नर संघाबाहेर जाण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे.

नागपूर कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाने ऑस्ट्रेलियातून आणखी एका फिरकी गोलंदाजाला भारतात बोलावले आहे. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. हा खेळाडू दिल्ली कसोटीत पदार्पण करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. कुहनेमनने अलीकडेच बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि गेल्या वर्षी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले होते. दिल्ली कसोटीतही खेळपट्टीवर वळण मिळणे निश्चित मानले जात आहे आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया आता आपले फिरकी आक्रमण मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.