‘आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांची हत्या केली असती’, दलित नेत्याच्या वक्तव्यावरून वाद


तेलंगणात एका दलित नेत्याने संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी दलित नेत्याला अटक केली. आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, ‘आज आंबेडकर जिवंत असते, तर मी त्यांची हत्या केली असती.


दलित नेते आणि राष्ट्रीय दलित आर्मीचे संस्थापक हमारा प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर व्हिडिओ बनवला होता. यामध्ये प्रसादने डॉ. आंबेडकरांचे ‘रिड्स इन हिंदूइझम’ हे पुस्तक दाखवले. व्हिडिओमध्ये तो डॉ. आंबेडकरांविरोधात अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलताना दिसत आहे. आज आंबेडकर हयात असते तर गोडसेने गांधींना ज्या प्रकारे मारले होते त्याचप्रमाणे मी त्यांची हत्या केली असती, असेही ते म्हणाले. याच व्हिडिओमध्ये हमारा प्रसाद यांनी डॉ. आंबेडकरांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचाही आरोप केला आहे.

डॉ. आंबेडकरांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या दलित नेत्याविरोधात बहुजन समाज पक्षाचे प्रमुख आर.एस.प्रवीण कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध 153A आणि 505(2) अन्वये एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे.