रोहित शर्माच्या आशेवर फेरले पाणी, मिळाली वाईट बातमी!


रोहित शर्माच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबतची ही आशा आहे. गेल्या महिन्यात, भारतीय कर्णधाराने आशा व्यक्त केली होती की जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकेल, परंतु वृत्तानुसार, तसे होणार नाही. कारण जसप्रीत बुमराह सध्या एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. हा खेळाडू आता तंदुरुस्त असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो, अशा बातम्या आल्या होत्या, पण आता तसे होणे कठीण आहे.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुमराहची संघात निवड झालेली नाही आणि शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात अद्याप निवड झालेली नाही.

रिपोर्टनुसार, टीम इंडिया जसप्रीत बुमराहबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. बुमराह फिट झाला तरी या खेळाडूला संधी दिली जाणार नाही. विश्वचषक पाहता हे सर्व घडत आहे. यंदा भारतात विश्वचषक आहे आणि हे लक्षात घेऊन बुमराहवर वर्कलोड मॅनेजमेंट करण्यात येणार आहे. बुमराह कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या वनडे मालिकेत खेळू शकतो, असे वृत्त आहे. 17 मार्चपासून मुंबईत वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता बुमराहने पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी सुरू केली आहे. एनसीएमध्ये गेल्या काही दिवसांत त्याने दीर्घ सत्रांमध्ये गोलंदाजी केली आहे. दुस-या दिवशी त्याला शरीरात जडपणा जाणवला नाही, ही एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्माला आपला सामनाविजेता गोलंदाज हवा होता, हेही खरे असले तरी तशी, रोहितकडे पर्यायांची कमतरता नाही. बुमराहच्या अनुपस्थितीत, सिराज आणि शमी अप्रतिम गोलंदाजी करत आहेत आणि कसोटी मालिका भारतात असल्याने अश्विन, जडेजा आणि अक्षर येथे मोठी भूमिका बजावत आहेत. बुमराह जेव्हाही परतेल तेव्हा तो सतत क्रिकेट खेळेल अशी अपेक्षा आहे.