कोहली नागपूरमध्ये मोडणार आणखी एक ‘विराट’ विक्रम, फक्त 64 धावांची गरज


भारतीय फलंदाज विराट कोहलीने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत इतक्या धावा केल्या आहेत की आता जेव्हा तो मैदानात उतरतो, तेव्हा त्याच्यासमोर आणखी जुना विक्रम मोडीत निघतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही असेच काही घडू शकते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात सुरु आहे. या सामन्यात विराट कोहलीने 64 धावा केल्या, तर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. कोहलीने 64 धावा करताच तो करिअरमधील 25 हजार धावा पूर्ण करेल.

विराट कोहलीच्या नावावर सध्या 24936 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने 490 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 74 शतके आणि 129 अर्धशतकांच्या मदतीने या धावा केल्या आहेत. कोहलीने नागपुरात 64 धावा केल्या तर सचिन तेंडुलकरनंतर 25 हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय ठरेल.

सध्या एकही क्रिकेटपटू कोहलीच्या आसपास नाही. सक्रिय खेळाडूंद्वारे सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहलीच्या खालोखाल इंग्लंडचा जो रूट येतो. रूटने 317 सामन्यात 17,729 धावा केल्या आहेत.

जगात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली सहाव्या स्थानावर आहे. सर्वाधिक 34357 धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचे नाव आहे. यानंतर कुमार संगकारा (28016), रिकी पाँटिंग (27483), महेला जयवर्धने (25957), जॅक कॅलिस (25534) आणि विराट कोहलीचा क्रमांक लागतो.