IND vs AUS: शुभमन गिलला वगळून का केले सूर्यकुमार यादवचे कसोटी पदार्पण?


प्रतीक्षा संपली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची सुरुवात तसेच सूर्यकुमार यादवचे कसोटी पदार्पण. नागपूर कसोटीत नाणेफेकीसोबत भारतीय कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला खेळवण्याची घोषणा केली. प्लेइंग इलेव्हनच्या संयोजनावर बोलताना त्याने दोन खेळाडूंच्या पदार्पणाबद्दल सांगितले, ज्यामध्ये सूर्यकुमारचे नाव होते. भारतीय क्रिकेटमध्ये मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमारने 2021 मध्येच वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले. पण, आता त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. सूर्यकुमारने शुभमन गिलच्या जागी संघात स्थान मिळवले आहे.

सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली, ते ठीक आहे. पण शुभमन गिलच्या जागी त्याला ही संधी मिळाली आहे, याचे कारण काय असू शकते? तेही जेव्हा गिलची बॅट तळपत होती. तो सध्या सुपर हॉट फॉर्ममध्ये होता आणि ओपनिंग किंवा मिडल ऑर्डरमध्ये कुठेही खेळण्यास सक्षम होता. त्यामुळे यामागेही मोठे कारण आहे. सूर्यकुमारने कसोटी संघात स्थान का निर्माण केले ते पाहूया.

वास्तविक, खेळपट्टीचा मूड लक्षात घेऊन सूर्यकुमार यादवची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली आहे. अर्थात गिलचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. पण, नॅथन लायनसारख्या अनुभवी गोलंदाजाच्या फिरकीला खीळ घालण्याची ताकद सूर्यकुमार यादवमध्ये आहे, हे भारतीय संघ व्यवस्थापनाला चांगलेच ठाऊक आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, प्लेइंग इलेव्हनची निवड करताना त्याच्या फॉर्मपेक्षा खेळपट्टीच्या मूडनुसार खेळाडूच्या कौशल्याकडे अधिक लक्ष दिले जाईल. यामुळेच भारताच्या 11 खेळाडूंमध्ये सूर्यकुमारचे नाव आहे आणि गिल टीमच्या बाहेर आहे.

सूर्यकुमार व्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यालाही नागपूर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तो बराच काळ कसोटी संघासोबत होता, पण खेळू शकला नाही. पण यावेळी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याला ती संधी मिळाली.