IND vs AUS : अश्विनने मोडला 18 वर्षे जुना विक्रम, 89 सामन्यांमध्ये बनला नंबर 1


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत अश्विनला उशीरा का होईना पण मोठे यश मिळाले. त्याने अॅलेक्स कॅरीची विकेट घेतली. या विकेटसह त्याचे नागपुरात खाते तर उघडलेच पण 18 वर्षे जुना विक्रमही मोडीत निघाला.

अॅलेक्स कॅरीची विकेट घेतल्यानंतर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 450 बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. 89वी कसोटी खेळताना त्याने हा पराक्रम केला.

त्याचबरोबर अश्विनने अनिल कुंबळेचा 18 वर्षांपूर्वीचा सर्वात जलद 450 विकेट घेण्याचा विक्रम मोडला. कुंबळेने मार्च 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत 450 बळी पूर्ण केले होते. हा पराक्रम करण्यासाठी त्याने 93 सामने खेळले होते.

सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा भारतीय बनण्याबरोबरच अश्विन आता या शर्यतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे वेगवान 450 कसोटी बळी घेणारा तो जगातील दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने केवळ 80 सामन्यांमध्ये 450 कसोटी बळी घेतले होते.