वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांचा धमाका, ‘ट्रिपल सेंच्युरी’ने रचला इतिहास


वेस्ट इंडिजचा संघ बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर आणि कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि युवा फलंदाज तेजनरेन चंद्रपॉल यांनी इतिहास रचला. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 336 धावांची भागीदारी करत मोठा विक्रम केला.

ब्रॅथवेट आणि चंद्रपॉल ही वेस्ट इंडिजची पहिली जोडी आहे ज्यांनी पहिल्या विकेटसाठी 300 हून अधिक धावांची सलामी भागीदारी केली आहे. यापूर्वी हा विक्रम गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांच्या नावावर होता, ज्यांनी पहिल्या विकेटसाठी 298 धावांची भागीदारी केली होती.

क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनरेन चंद्रपॉल ही 21 व्या शतकातील पहिली सलामी जोडी आहे ज्यांनी 100 पेक्षा जास्त षटके फलंदाजी केली आहेत. यापूर्वी 2000 मध्ये अटापट्टू आणि जयसूर्या जोडीने पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता.

क्रेग ब्रॅथवेट आणि चंद्रपॉल यांनी मिळून 688 चेंडू खेळले, जो कोणत्याही सलामीच्या जोडीसाठी जागतिक विक्रम आहे. यापूर्वी हा पराक्रम अटापट्टू आणि जयसूर्याने केला होता. दोघांनी 686 चेंडूपर्यंत फलंदाजी केली.

क्रेग ब्रॅथवेटबद्दल सांगायचे तर, वेस्ट इंडिजच्या कसोटी कर्णधाराने त्याचे 12 वे शतक ठोकले. त्याने 8 संघांविरुद्ध कसोटी शतक झळकावले आहे. ब्रेथवेटने 182 धावांची खेळी केली.