धोनी देशापेक्षा मोठा आहे का? जगज्जेता खेळाडू भावनेच्या भारात हे काय बोलून गेला?


कोणताही खेळाडू जेव्हा क्रिकेट खेळायला लागतो, तेव्हा एक दिवस आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहतो. देशाला विजय मिळवून देणे हे त्यांचे पहिले ध्येय असते. अशा परिस्थितीत जगज्जेता खेळाडू प्रथम आपल्या कर्णधारासाठी आणि नंतर देशासाठी खेळला असे म्हटले, तर आश्चर्य वाटणे वाजवी आहे. भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनीबाबत हे वक्तव्य केले असून, यानंतर प्रश्न निर्माण झाला आहे की धोनी देशापेक्षा मोठा आहे का?

सुरेश रैना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या किती जवळ होता, हे सर्वांनाच माहीत आहे. टीम इंडिया असो किंवा चेन्नई सुपर किंग्ज, त्यांची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली आहे. रैनाने धोनीचे वर्णन नेहमीच मोठा भाऊ आणि जवळचा मित्र असे केले आहे. मात्र, त्याने आता केलेले वक्तव्य अनेकांना आवडले नाही.

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर काही मिनिटांनी सुरेश रैनानेही निवृत्ती घेतली. स्पोर्ट्स टॉकशी झालेल्या संवादात रैनाने याचे कारण सांगितले. तो म्हणाला, मी आणि धोनी अनेक सामने एकत्र खेळलो आहोत. मी खूप भाग्यवान आहे की मला धोनीसोबत भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचे सामने खेळण्याची संधी मिळाली. आम्हा दोघांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. मी गाझियाबादचा आहे आणि तो रांचीचा आहे. मी आधी धोनीसाठी आणि नंतर माझ्या देशासाठी खेळलो. हे एक खास नाते आहे. आम्ही अनेक फायनल खेळलो आणि विश्वचषकही जिंकला. तो एक अद्भुत कर्णधार आणि माणूस आहे.

रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून बराच काळ खेळला. मात्र, 2021 मध्ये झालेल्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने या खेळाडूला विकत घेतले नाही. चेन्नई सुपर किंग्जनेही त्याच्यासाठी बोली लावली नाही. यानंतर रैना कॉमेंट्री करताना दिसला. अलीकडेच, त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा देखील केली, त्यानंतर तो आता जगातील इतर टी-20 लीगमध्ये भाग घेतो.