अंधश्रद्धेतून 3 महिन्यांच्या मुलीची हत्या, निमोनिया बरा करण्यासाठी तिला 51 वेळा दिले गरम सळीचे चटके


मध्य प्रदेशात अंधश्रद्धेतून एका 3 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासीबहुल शहडोल जिल्ह्यात न्युमोनियाने पीडित मुलीला बरे करण्यासाठी अंधश्रद्धेतून तिच्या पोटावर 51 वेळा चटके देण्यात आले. त्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शहडोल जिल्ह्यातील सिंगपूर कथौटिया येथील एका 3 महिन्यांच्या मुलीला न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. अंधश्रद्धेमुळे घरच्यांनी तिला उपचारासाठी ढोंगी मांत्रिकाकडे नेले. त्याच्याकडे मुलाच्या रोगाचे औषध, गरम सळी होती. मुलीला एक-दोनदा नाही तर 51 वेळा सळ्यांचे चटके देण्यात आले. त्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली. अशा स्थितीत कुटुंबीयांनी तिला शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये नेले. पण मुलीला वाचवता आले नाही.

शहडोलच्या जिल्हाधिकारी वंदना वैद्य सांगतात, अंगणवाडी सेविकेने मुलीच्या आईला दोनदा मुलीला चटका न देण्याचा सल्ला दिला होता. असे असूनही चटके देण्यात आले. महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात गेले असता ही घटना 15 दिवस जुनी असल्याचे दिसून आले. न्यूमोनियाच्या वाढत्या संसर्गामुळे निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल भागात गरम सळ्यांनी चटके देण्याची वाईट प्रथा घातक ठरत आहे.