शुभमन गिलने अवघ्या 63 चेंडूत केली अशी कामगिरी, सेहवाग आणि रोहितसोबत जोडले गेले नाव


भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा स्टार उदयास आला आहे. शुभमन गिल असे या 23 वर्षीय स्टारचे नाव आहे. उजव्या हाताच्या भारतीय फलंदाजाने अवघ्या दीड महिन्यात अशा शतकांचा पाऊस पाडला की विक्रमच नष्ट झाले. भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये त्याचे नाव येऊ लागले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात केवळ 63 चेंडूत 126 धावांच्या विक्रमी खेळीने भारतीय संघाला विजय तर मिळवून दिलाच, शिवाय वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मासह त्याचे नावही विशेष यादीत जोडले.

गिलच्या 126 धावांच्या खेळीने विराट कोहलीचा 122 धावांचा विक्रम मोडला, जो या फॉरमॅटमधील भारताच्या सर्वात मोठ्या खेळीचा नवा विक्रम आहे. अशाप्रकारे भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम सलामीवीरांच्या नावावर आहे.

भारताकडून कसोटीत सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. मार्च 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत सेहवागने 319 धावा केल्या होत्या.

त्याचवेळी, वनडेमधला हा विक्रम तब्बल 9 वर्षांनंतरही स्टार सलामीवीर आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती.