IND vs AUS कसोटी पाहण्यासाठी जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, जाणून घ्या कोणासोबत करणार सामना एन्जॉय


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर आहे. या संघाला येथे 9 फेब्रुवारीपासून सुरू होणारी चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे होणार असून दोन खास पाहुणे हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्च दरम्यान होणारा चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी येणार आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे.

हा सामना भारताच्या पंतप्रधानांच्या नावावर असलेल्या स्टेडियममध्ये खेळवला जाईल. जेव्हापासून या स्टेडियमला ​​मोदींचे नाव देण्यात आले, तेव्हापासून ते पहिल्यांदाच या स्टेडियममध्ये सामना पाहणार आहेत.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात होणार आहे. यानंतर दिल्लीत दुसरा कसोटी सामना होणार आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या भारताच्या आशा या मालिकेवर टिकून आहेत. भारताने ही मालिका जिंकली, तर ते अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया भारतामध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.