पांड्याने शुभमन गिलला बनवले ‘बॉल ऑफ फायर’, सामन्यापूर्वी काय केले होते कर्णधाराने ?


शुभमन गिल… हे नाव सध्या क्रिकेट जगतात चर्चेत आहे. शुभमन गिल मैदानात उतरताच गोलंदाजांची धुलाई सुरू होते आणि हा फलंदाज चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतो. एवढेच नाही तर गिलला आता शतक झळकावण्याची सवय लागली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्येही हेच पाहायला मिळाले. अहमदाबाद टी20 मध्ये गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. गिलचा स्ट्राईक रेट 200 होता. गिलच्या या शतकी खेळीच्या मागे हार्दिक पांड्याचा हात होता, हे तुम्हाला माहीत आहे का?

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या शुभमन गिलशी बातचीत केली. बीसीसीआयने या संभाषणाचा व्हिडिओही ट्विट केला आहे. पांड्याने शुभमनला त्याच्या सर्वोत्तम खेळीचे रहस्य विचारले आणि सलामीवीराने त्याचे श्रेय कर्णधाराच्या मेहनतीला आणि विश्वासाला दिले.

शुभमन गिल म्हणाला, याआधी टी-20 मध्ये मी माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पण माझ्या खेळात मला कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज आहे. शुभमनने हार्दिकला सांगितले की, तुम्ही मला सामन्यापूर्वी सांगितले होते की, काही वेगळे करण्याची गरज नाही, फक्त तुमचा सामान्य, नैसर्गिक खेळ खेळा. मी तेच केले. या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप मदत करतात.

गिलने मुलाखतीत सांगितले की, फक्त मला माझ्या खेळात मानसिकदृष्ट्या स्वच्छ असायला हवे. मी जेव्हा षटकार मारत असे, तेव्हा हार्दिक पांड्या मला माझा आकार राखण्यास सांगत होता. तुम्ही जे करत आहात ते करा. खूप वेगाने चेंडू मारण्याचा प्रयत्न करू नका. गिल म्हणाला, मला सँटनरविरुद्ध मोठे फटके मारायचे होते, पण तू मला थांबवलेस आणि म्हणालास की हा खेळाडू चांगली गोलंदाजी करत आहे, त्यामुळे आदर द्या आणि पुढच्या गोलंदाजावर हल्ला करा.

हार्दिक म्हणाला, शुभमन अशा लोकांपैकी एक आहे, जो जास्त प्रयत्न न करता धावा काढू शकतो. मी नेहमी म्हणतो की शुभमनने सामान्य खेळ केला, तर तो चांगली कामगिरी करेल, धावा काढेल. मी युवा खेळाडूंनाही सांगू इच्छितो की तुम्ही केवळ मेहनतीनेच अव्वल स्थानी पोहोचू शकता.