Budget 2023 : आता घरी बसलेल्या महिलांना मिळणार 15 हजार रुपये, या योजनेत गुंतवावे लागणार पैसे


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023 चा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना मोठी भेट देताना सीतारामन यांनी त्यांच्यासाठी एक नवी छोटी बचत योजना जाहीर केली आहे. महिला सन्मान बचत पत्र असे या योजनेचे नाव आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की ही योजना मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. महिला किंवा मुली यामध्ये गुंतवणूक करू शकतील. या अल्पबचत योजनेत महिलांना 7.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

अर्थसंकल्पीय भाषणानुसार, महिला सन्मान बचत पत्र योजनेत जास्तीत जास्त ठेव रक्कम 2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय, गुंतवणूकदारांना योजनेत अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील मिळेल.

महिला सन्मान बचत पत्रात सरकारने 7.5 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या अल्पबचत योजनेत एक महिला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. अशा प्रकारे, तिला 7.5 टक्के दराने 15,000 रुपये नफा मिळेल.

सीतारामन यांनी असेही सांगितले की, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, ग्रामीण महिलांचा समावेश करून 81 लाख स्वयं-सहायता गट तयार करण्यात आले आहेत. ते म्हणाले की या गटांना मोठ्या उत्पादक उपक्रम किंवा सामूहिक माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या पुढील टप्प्यावर पोहोचण्यास मदत करेल.

सीतारामन यांनीही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकीची कमाल रक्कम 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणुकीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आता एखादी व्यक्ती 4.5 लाख रुपयांऐवजी 9 लाख रुपये गुंतवू शकते.

याशिवाय, नवीन कर प्रणालीमध्ये वैयक्तिक आयकर सवलतीची मर्यादा सध्याच्या पाच लाख रुपयांवरून सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अशाप्रकारे, नवीन कर प्रणालीमध्ये सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याच वेळी, नवीन वैयक्तिक आयकर प्रणालीमध्ये, कर रचनेतील स्लॅबची संख्या सहा वरून पाच करण्यात आली. कर सवलतीची मर्यादा तीन लाख रुपये करण्यात आली आहे.