भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माने सोमवारी वेस्ट इंडिजवर कहर केला. तिने संपूर्ण कॅरेबियन संघाला तिच्यापुढे झुकवले. 3 देशांच्या टी-20 मालिकेतील गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात दीप्ती आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रथम कॅरेबियन संघाला 94 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी हे लक्ष्य 13.5 षटकांत पूर्ण करत 8 विकेट्स राखून विजय मिळवला. दीप्तीने 4 षटकात 2 मेडनसह 11 धावा देत 3 बळी घेतले, तर राजेश्वरीने चार षटकात 9 धावा देत एक बळी घेतला. पूजा वस्त्राकरने चार षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने सर्वाधिक 34 धावा केल्या, मात्र उर्वरित फलंदाज भारतीय आक्रमणासमोर टिकू शकले नाहीत आणि कॅरेबियन संघ निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 94 धावाच करू शकला.
दीप्तीचा वेस्ट इंडिजवर कहर, 13.5 षटकांत भारताचा झंझावाती विजय
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी 2 फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याचे तिकिट आधीच निश्चित केली आहेत. भारताकडून सलामीवीर जेमिमाह रॉड्रिग्जने 39 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 23 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची अभेद्य भागीदारी केली. स्मृती मानधनाने 5 तर हरलीन देओलने 13 धावा केल्या.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो भारतीय गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले आणि सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. रेणुका सिंग आणि शिखा पांडे यांना पहिली 3 षटके टाकायला मिळाल्यानंतर कर्णधाराने दीप्तीकडे चेंडू सोपवला आणि तिने सलग दोन चेंडूंत रशादा विल्यम्स (8) आणि शमन कॅम्पबेल (0) यांच्या विकेट घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. चौथ्या षटकात एकही धाव न देता आपले आव्हान कायम ठेवले.
एका टोकाकडून दीप्तीने तर दुसऱ्या टोकाकडून राजेश्वरीने जबाबदारी स्वीकारली. राजेश्वरीने 9व्या षटकात जेनाबा जोसेफची शिकार केली. यानंतर पूजा वस्त्राकरने विंडीजची कर्णधार मॅथ्यूजची शिकार केली. वेस्ट इंडिजचा संघ 12व्या ते 15व्या षटकात केवळ 5 धावा करू शकला. 18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीप्तीने शबिका गजनबीला यष्टीचीत केले, तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर वस्त्राकरने आलियाला लक्ष्य केले.