रॉयच्या झंझावाती शतकानंतर बिथरलाचा संघ, 125 धावांत गमावले सर्व गडी


इंग्लिश सलामीवीर जेसन रॉयच्या झंझावाती शतकावर दक्षिण आफ्रिकेने पाणी फेरले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रॉयच्या स्फोटक खेळीनंतर इंग्लंडचा मोठा विजय दिसत होता, मात्र 20व्या षटकात दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने रासी व्हॅन डर ड्युसेनच्या 111 धावांच्या जोरावर 7 गडी गमावून 298 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लिश संघाला जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांनी झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 146 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडने 19.2 षटकापर्यंत एकही विकेट गमावली नव्हती.

ही भक्कम भागीदारी पाहून दक्षिण आफ्रिकेला धक्काच बसला. त्यांचा लाजिरवाणा पराभव दिसत होता, पण 20व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मालनला 59 धावांवर बाद करून सिसांडा मगालाने ही शतकी भागीदारी मोडली.

मालन आणि रॉय यांच्यातील भागीदारी तुटताच इंग्लिश संघ विस्कळीत झाला आणि त्यानंतर संपूर्ण संघ आणखी 125 धावाच जोडू शकला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 125 धावांत इंग्लंडच्या सर्व 10 विकेट घेतल्या. एके काळी ज्या संघाची धावसंख्या 146/0 होती, तो पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 44.2 षटकांत 271 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्खियाने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यांच्याशिवाय सिसांडाने 3, कागिसो रबाडाने 2 आणि तबरेझ शस्मीने 1 बळी घेतला.

रॉय आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही, पण इंग्लंडसाठी आनंदाची बातमी आहे की तो पुनरागमनासह फॉर्ममध्ये आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. यादरम्यान, तो दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळला, परंतु तेथेही तो सुपर फ्लॉप ठरला. गेल्या 10 डावात तो 4 वेळा दुहेरी आकडाही गाठू शकला नाही, आता इंग्लिश संघात पुनरागमन करत त्याने शतक झळकावले. रॉयने 113 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने 79 चेंडूत 11 वे वनडे शतक पूर्ण केले.