विराट कोहलीने झेल टिपल्यानंतर दाखवला आपला अनोखा अंदाज, व्हिडीओ व्हायरल


इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने वनडे क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. या सामन्यात विराट कोहलीची बॅट फार काही करू शकली नाही, पण आपल्या डान्सने तो नक्कीच चर्चेत आला. विराटने या सामन्यात 27 चेंडूत 36 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. जेकब डफीच्या चेंडूवर तो फिन ऍलनकरवी झेलबाद झाला.

या मालिकेत विराटची बॅट चालली नाही. त्याच्या बॅटमधून अर्धशतकांची एकही खेळी निघाली नाही. विराटने पहिल्या सामन्यात आठ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याने 11 धावा केल्या. म्हणजेच तीन सामन्यांत त्याच्या बॅटमधून केवळ 55 धावा निघाल्या.


तिसर्‍या सामन्यात टीम इंडियाचा विजय निश्चित वाटत होता, पण डेव्हन कॉनवे ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. ग्लेन फिलिप्स हा असा फलंदाज आहे की तो खेळत राहिला असता तर भारताच्या अडचणीत भर पडली असती. पण असे झाले नाही. 28व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फिलिप्सने ठाकूरचा चेंडू डीप मिडविकेट बाऊंड्रीबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला पण कोहलीने त्याचा झेल घेतला. हा झेल टिपल्यानंतर कोहली खूप आनंदी दिसला आणि मग तो नाचू लागला.

फिलिप्सने सात चेंडूत पाच धावा केल्या. 200 धावांवर त्याची विकेट पडली. न्यूझीलंडची पाचवी विकेट म्हणून तो बाद झाला आणि इथून कॉनवे एकटाच राहिला आणि नंतर तोही बाद झाला. 230 धावांवर त्याची विकेट पडली.