अशी होती देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड


१९५० साली भारत गणराज्य असल्याची घोषणा केली गेली आणि त्याचवेळी पहिली गणतंत्र परेड केली गेली. या परेडमध्ये ३ हजार जवान आणि १०० लढाऊ विमाने सामील झाली होती. तत्कालीन गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांनी २६ जानेवारी १९५० या दिवशी सकाळी १० वा.१८ मिनिटांनी भारत गणराज्य बनल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर सहा मिनिटांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

प्रजासत्ताक दिनाचा समारोह पूर्वीच नक्की करण्यात आला होता. त्यानुसार दुपारी अडीच वाजता डॉ. राजेंद्रप्रसाद आपण नाणेफेक जिंकून मिळविलेल्या ऐतिहासिक बग्गीतून राष्ट्रपती भवनातून निघाले आणि ३ वा. ४५ मिनिटांनी त्यावेळच्या इर्विन आणि आताच्या नॅशनल स्टेडियम मध्ये पोहोचले. तेथे त्यांना ३१ तोफांची सलामी दिली गेली. या कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेलाही सामील केले गेले होते.

pared1
१९५५ सालपासून प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथवरून काढण्याचा आणि ध्वजारोहण लाल किल्ल्यावर करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो उपस्थित होते. अत्तापर्यंत ४४ देशाचे प्रमुख नेते प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्तक दिनाला उपस्थित राहिले आहेत.

१९५९ मध्ये प्रथम परेड पाहायला येणाऱ्या लोकांवर विमानातून पुष्पवृष्टी केली गेली. १९६२ मध्ये चीनकडून युद्धात पराभव पत्करावा लागल्यावर देशएकतेचे प्रतिक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू अनेक खासदारांसह एक दल बनवून परेडमध्ये सामील झाले होते. याच वर्षी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत गाईले. ७१ च्या पाक युद्धानंतर सुरक्षेच्या कारणाने काही बदल केले गेले.

१९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमरजवान ज्योतीवर श्रद्धांजली वाहण्याची प्रथा सुरु केली आणि १९८२ साली प्रथम रंगीत व्हिडीओ शुटींग केले गेले. आता प्रजासत्ताक दिनाच्या परेडची भव्यता खूपच वाढली असून देश विदेशातून ती पाहण्यासाठी लोक येतात.