रोहितच्या बॅटने केली कमाल, केली पाँटिंग आणि जयसूर्याची बरोबरी


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंदूरच्या मैदानावर पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवली आहे. या सामन्यात रोहितने टी-20 मध्ये शतक झळकावल्यासारखे या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केला आणि यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली.

रोहितचे वनडेतील हे 30 वे शतक आहे. यासह, तो 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि त्याने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. पाँटिंगच्या नावावर वनडेमध्ये 30 शतके आहेत.

भारताच्या सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके झळकावली आहेत. दुसरीकडे, विराट कोहली आहे जो सचिनची बरोबरी करण्यापासून तीन शतके दूर आहे. या दोघांनंतर रोहित आणि पाँटिंगचा नंबर लागतो.

तीन वर्षांनंतर रोहितचे वनडेतील हे पहिले शतक आहे. यापूर्वी त्याने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. या शतकासह रोहितने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचीही बरोबरी केली आहे. जयसूर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 28 शतके झळकावली आहेत. सलामीवीर म्हणून रोहितचे हे 28 वे वनडे शतक आहे.

रोहित मात्र शतक पूर्ण करून लवकर बाद झाला. त्याने 85 चेंडूंत नऊ चौकार आणि सहा षटकारांसह 101 धावांची खेळी केली.