बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. बागेश्वर सरकारने स्वतःवरील अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाबाबत पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आमच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करणारे लोक येतच राहतील. ते म्हणाले की, बागेश्वर बालाजीच्या दरबारात लाखो लोक येतात. सनातन धर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांवर समाजातून बहिष्कार टाकला जाईल.
‘मी जे लिहीन… ते खरे होईल, गोंधळ करणाऱ्यांना धडा शिकवणार’- धीरेंद्र शास्त्री
एएनआयशी बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, आमच्याकडे एकही बंद खोली नाही. ज्यांनी मला आव्हान दिले आहे, त्यांनी स्वतः येऊन बघावे. माझ्या बोलण्याला आणि कृतीला कॅमेऱ्यात कोणीही आव्हान देऊ शकते, पण इथे लाखो लोक येतात आणि बागेश्वर बालाजीच्या दरबारात बसतात. ते म्हणाले, मला जे काही प्रेरणा देईल, ते मी लिहीन आणि मी जे लिहितो ते खरे होईल. माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे.
बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दावा केला की, मला हे कौशल्य देवाच्या कृपेने, आमच्या गुरूंच्या आणि सनातन धर्माच्या मंत्रांच्या सामर्थ्याने मिळाले आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. ही सत्य सनातन धर्माची घोषणा आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमधील छतरपूर भागात राहणारे शास्त्री म्हणाले, जो कोणी सनातन धर्माच्या विरोधात बोलेल त्याच्यावर बहिष्कार टाकला जाईल. काही लोक गोंधळ घालत आहेत. त्यांना धडा शिकवावा लागेल. मी जिवंत असेपर्यंत सर्व सनातनी हिंदूंना त्यांच्या मूळ धर्मात परत आणीन.