रस्ता अपघातानंतर ऋषभ पंतचे पहिले ट्विट, लिहिले- परतीचा प्रवास सुरू, आव्हानांसाठी सज्ज


भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतने रस्ता अपघातानंतर पहिल्यांदाच ट्विट केले आहे. आपल्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता पुनरागमनाचा प्रवास सुरू झाल्याचे पंतने सांगितले. यासोबतच त्याने बीसीसीआय, बीसीसीआय सचिव जय शाह आणि सरकारचे या अपघातात मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. 30 डिसेंबर रोजी घरी परतत असताना ऋषभ पंतचा रुरकीजवळ अपघात झाला. त्याची भरधाव वेगात असलेली कार दुभाजकावर आदळल्यानंतर लांबपर्यंत खेचत गेली. यानंतर कारने पेट घेतला. मात्र, पंत वेळीच गाडीतून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. आता पंतने ट्विट करून आपल्या प्रकृतीबद्दल सांगितले आहे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.


एका वेगळ्या ट्विटमध्ये पंत यांनी रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांचेही आभार मानले, ज्यांनी पंतचा जीव वाचवला आणि अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेले. पंत याने लिहिले, मी प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानू शकत नाही, परंतु मला या दोन वीरांचे आभार मानले पाहिजेत, ज्यांनी अपघातादरम्यान मला मदत केली आणि मी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचलो याची खात्री केली. रजत कुमार आणि निशू कुमार यांचे धन्यवाद. मी नेहमीच तुमचा ऋणी आणि आभारी राहीन.

ऋषभ पंतने पुढे लिहिले, मी सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी नम्र आणि कृतज्ञ आहे. मला तुम्हाला कळवताना आनंद होत आहे की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. बरे होण्याचा प्रवास सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे.