निवडकर्त्यांनी केले दुर्लक्ष, नंतर पाडला धावांचा पाऊस, त्रिशतक झळकावून टीम इंडियात परतला पृथ्वी शॉ


भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या पुनरागमनासाठी बराच वेळ टीम इंडियाचे दार ठोठावत होता. अखेर त्याला टीम इंडियात एन्ट्री मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नवीन वरिष्ठ निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघ निवडला ज्यामध्ये शॉचा समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ केल्याबद्दल शॉला बक्षीस मिळाले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सतत धावा करत होता आणि त्याच्या जोरावर तो पुनरागमनाचा दावा करत होता.

शॉने 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि आता तो बऱ्याच कालावधीनंतर परतला आहे. शॉने 23 जुलै 2021 रोजी टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.

शॉ संघाबाहेर असल्यापासून तो परतीचा मार्ग शोधत होता आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत होता. या फलंदाजाने 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी केली आणि 10 सामन्यांमध्ये एकूण 332 धावा केल्या. यादरम्यान शॉच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राइक 181.42 होता. अलीकडेच शॉने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध ३७९ धावांची इनिंग खेळून खळबळ उडवून दिली होती. आतापर्यंत रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 539 धावा निघाल्या आहेत.

शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. या संघाकडून खेळताना शॉने 2021 मध्ये 15 सामन्यांत 31.93 च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार अर्धशतके झळकली. मात्र, शॉचा शेवटचा आयपीएल हंगाम काही खास नव्हता. त्याने 10 सामन्यांत 28.30 च्या सरासरीने केवळ 283 धावा केल्या.

शॉने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. या सामन्यात शॉने 134 धावांची खेळी खेळली. तो एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचा नियमित सलामीवीर होता पण सततच्या अपयशामुळे त्याला मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियातून वगळण्यात आले. आता शॉ टी20 मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्याला इतर दोन फॉरमॅटमध्येही संधी मिळेल.

शॉ टीम इंडियात परतला आहे पण त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळते की नाही हे पाहावे लागेल. न्यूझीलंडविरुद्ध निवडलेल्या संघात शुभमन गिल आणि इशान किशन यांचीही नावे आहेत. हे दोघेही डावाची सुरुवात करतील, असे मानले जात आहे. आता शॉ या दोघांवर मात करून आपला दावा कसा मांडतो हे पाहावे लागेल. या दोघांपैकी एकाला दुखापत झाली तर शॉला नक्कीच संधी मिळेल.