टीमने बोलावले, कुलदीपने करुन दाखवले, पूर्ण केले ‘दुहेरी शतक’


टीम इंडियात नियमित स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला फिरकीपटू कुलदीप यादव जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा त्याचा फायदा उठवण्यात कसूर करत नाही. पुन्हा एकदा कसे तरी त्याने संघात स्थान मिळवले आणि येताच विकेट्स घेत धुमाकूळ घातला आणि विकेट्सचे द्विशतकही पूर्ण केले.

गुरुवार 12 जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात आलेल्या कुलदीपने एकापाठोपाठ तीन विकेट घेतल्या. यासह कुलदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 200 बळी पूर्ण केले. कुलदीपने 107 सामन्यांच्या 110 डावांमध्ये हा पराक्रम केला आणि हा टप्पा गाठणारा तो भारताचा 23वा गोलंदाज ठरला.

कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 122 विकेट घेतल्या आहेत. कुलदीपने 72 डावांमध्ये या 122 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोनदा हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रमही केला आहे. त्याचबरोबर कुलदीपला जेव्हा-जेव्हा कसोटी आणि टी-20 मध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या नावावर कसोटीतील 14 डावांत 34 आणि टी-20च्या 24 डावांत 44 बळी आहेत.

कुलदीपने 25 मार्च 2017 रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने पर्यायाने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पदार्पण केले.