आशिया चषकात 3 वेळा भिडणार भारत-पाकिस्तान !


संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहे. अलीकडेच, हे संघ दोनदा आशिया कपमध्ये भिडले आणि 2022 च्या टी-20 विश्वचषकातही या दोघांमध्ये संघर्ष झाला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढत निश्चित झाली आहे. हे दोन्ही संघ आशिया कप 2023 मध्ये भिडणार आहेत. गुरुवारी आशियाई क्रिकेट परिषदेने मोठी घोषणा करताना स्पर्धेचे स्वरूप आणि गट जाहीर केले. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी गुरुवारी ट्विट केले की, आशिया चषक स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून या संघांची दोन गटात विभागणी केली जाईल. मोठी बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत.

आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकूण 6 संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात होणार असून संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. एसीसीने तयार केलेल्या फॉर्मेटनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित आहे.

भारत आणि पाकिस्तानला गट 1 मध्ये ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेचा संघही या गटात आहे. दुसरीकडे, गट 2 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेशचा संघ असून त्यात पात्रता संघाचाही समावेश असेल. साखळी टप्प्यात एकूण 6 सामने खेळवले जातील. त्याचबरोबर साखळी फेरीनंतर सुपर-4 फेरी खेळवली जाईल. याचा अर्थ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यापैकी कोणत्याही एकाचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच संपेल. सुपर 4 फेरीत एकूण 6 सामने खेळले जातील आणि त्यानंतर अंतिम दोन संघ ठरवले जातील. म्हणजेच आशिया कपमध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचे तीन सामने पाहायला मिळू शकतात. साखळी फेरीत दोघांची स्पर्धा निश्चित आहे. यानंतर, दोन्ही संघ सुपर-4 फेरीतही भिडू शकतात. गुणांच्या बाबतीत दोन्ही संघ अव्वल 2 मध्ये राहिले तर अंतिम सामनाही दोघांमध्ये पाहायला मिळू शकतो.

आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार होता, परंतु अलीकडेच ACC प्रमुख जय शाह यांनी ही स्पर्धा पाकिस्तानच्या भूमीवर होणार नसल्याचे सांगितले होते. आता ही स्पर्धा कुठे आयोजित केली जाते हे पाहायचे आहे.