‘रोमियो अँड ज्युलिएट’च्या स्टार्सनी 55 वर्षांनंतर दाखल केला ८०० कोटींचा खटला, म्हणाले- परवानगीशिवाय शूट केले होते न्यूड सीन

लॉस एंजेलिस: वृत्तसंस्था आपण अल्पवयीन असताना दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेने दिशाभूल करून आपल्याला नग्न दृष्य देण्यास भाग पाडले. त्यामुळे आपल्याला आयुष्यभराची हानी सोसावी लागली असा दावा करून ‘रोमिओ ज्युलिएट’ चित्रपटात नायक आणि नायिकेची भूमिका केलेल्या कलाकारांनी निर्मिती संस्थेवर 100 कोटी डॉलर्सच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.

‘रोमिओ ज्युलिएट’ हा चित्रपट सन १९६८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात नायिकेची भूमिका करणाऱ्या ऑलीव्हीआ हसी त्यावेळी १५ तर नायकाची भूमिका करणारे लिओनार्द व्हाईटिंग १६ वर्षांचे होते. हे दोघे आता अनुक्रमे ७१ व ७२ वर्षांचे आहेत. या दोघांनी पॅरामाऊंट पिक्चर्सवर प्रांतीय उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.

चित्रपटात ऐनवेळी प्रणयदृष्य घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे चित्रीकरणही सर्वात शेवटी करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँको जेफीरेली यांनी हे दृश्य चित्रित करताना त्वचेच्या रंगाची अंतर्वस्त्र घालण्यास सांगितले. प्रत्यक्षात चित्रीकरणाच्या वेळी वस्त्रांशिवाय दृष्य देण्याची गळ घातली, असे याचिकेत नमूद केले आहे.

चित्रपटाच्या हितासाठी हे दृश्य वस्त्र परिधान न करता चित्रित करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास चित्रपट चालणार नाही. त्यामुळे तुमच्या कारकिर्दीलाही खीळ बसेल, असे आपल्याला दिग्दर्शकांनी सांगितले. त्यामुळे हे दृश्य विनावस्त्र चित्रित करण्याशिवाय पर्याय नाही, अशी आमची समजूत झाली. शिवाय हे दृश्य अशा तऱ्हेने चित्रित करण्यात येईल की, त्यात नग्नतेचे प्रदर्शन असणार नाही, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा शब्द पाळला गेला नाही आणि कॅलिफोर्नियाचे प्रांतीय कायदे आणि अमेरिकेचे केंद्रीय कायदे धाब्यावर बसवून हे दृष्य विवस्त्र चित्रित केले गेले, असा कलाकारांचा आक्षेप आहे.

या चित्रपटात नायकाचा पार्श्वभाग आणि नायिकेचे वक्षस्थळ अनावृत्त दाखविण्यात आले आहे. त्या काळात हा चित्रपट चांगलाच गाजला. शेक्सपिअरच्या नाटकांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा चित्रपट दाखविण्यात येत असे. मात्र, या चित्रपटाच्या यशाचा आपली कारकीर्द घडविण्यासाठी कोणताही उपयोग झाला नाही. उलट आपल्याला दशकानुदशके मानसिक त्रास आणि भावनिक कुचंबणा यांना सामोरे जावे लागले, असे कलाकारांच्या वतीने याचिकेत नमूद करण्यात आले आहे.