पाकिस्तान कंगाल; नागरिकांचे अतोनात हाल जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर


इस्लामाबाद: प्रचंड आर्थिक विपन्नावस्थेच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानात सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होत असून महागाई आवाक्याबाहेर गेली आहे. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

पाकिस्तानातील नागरिकांच्या आहारात मांसाहार ही एक अनिवार्य बाब मानली जाते. मात्र, चिकन किंवा मटण खरेदी करण्याची सामान्य माणसाची ऐपत राहिलेली नाही. सध्या त्या ठिकाणी चिकनचा भाव तब्बल ६५० रुपये प्रति किलो एवढा आहे. काही दिवसांपूर्वी तो ८०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मटण विकत घेण्याचा विचारही सामान्य नागरीक करू शकत नाहीत.

रोज लागणाऱ्या आटा, साखर, तूप अशा खाद्य पदार्थांचे भावही गगनाला भिडले आहेत. या पदार्थांचे भाव सामान्य परिस्थितीत असणाऱ्या सरासरी भावांपेक्षा २५ ते ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दोन वेळचे जेवण करणेही अवघड बनत चालले आहे.

स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) ही पाकिस्तानात सध्या सर्वात दुर्मीळ वस्तू बनली आहे. विशेषत: खैबर पखतूनवा प्रांतात चक्क फुग्यासारख्या दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून गॅस विकला जात आहे. गॅसच्या पाईपमधून गॅस वितरक कॉम्प्रेसरच्या साहाय्याने पिशव्यांमध्ये गॅस भरत आहेत. या पिशव्या व्हॉल्व आणि नोजलने त्यांची तोंडे बंद केली जात आहेत. खैबर प्रांतात सन २००७ पासून नवीन गॅस जोडण्या देणे बंद आहे. पिशव्यांमध्ये ३ ते ४ किलो गॅस भरून त्याची विक्री केली जात असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहेत. अर्थातच, शासकीय पातळीवरून त्याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.