मर्सिडीजचे अपघात, नशिबाने वाचला ऋषभ, सायरस यांचे मात्र गेले प्राण
टीम इंडियाचा फलंदाज विकेटकीपर ऋषभ पंतला झालेल्या भीषण कार अपघातानंतर त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला असल्याचे डॉक्टर्स रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. मात्र या निमित्ताने मर्सिडीजच्या सुरक्षित कार्स, ऋषभ पंत आणि सायरस मिस्री यांच्या अपघातातील साम्य चर्चेत आले आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचे अपघाती निधन झाले ती कार सुद्धा मर्सिडीज होती आणि या दोन्ही ठिकाणी कार डिव्हायडर वर धडकून अपघात झाले. अर्थात ऋषभ सुदैवी ठरला आणि अपघातातून बचावला, सायरस यांना मात्र मृत्यूस सामोरे जावे लागले.
ऋषभची मर्सिडीज एमएजी. जीएलई ४३ कुपे १.२ कोटी रुपये किमतीची असून या कार्सची सिक्युरिटी फीचर्स टॉपची आहेत. कारने क्रॅश टेस्टिंग मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळविले आहे. या कारला एबीएस, ब्रेक असिस्टंट, सेन्ट्रल लॉक, पॉवर डोर लॉक, मल्टीपल एअर बॅग्स, सीट बेल्ट वॉर्निग, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग, व्हेईकल स्टॅबिलीटी कंट्रोल, क्रॅश सेन्सर अशी फीचर्स आहेत. २९९६ सीसी पेट्रोल इंजिन, ९ स्पीड ऑटो ट्रान्समिशन सह असून या पाच सीटर एसयुवीचा टॉप स्पीड ताशी २५० किमी आहे.
ऋषभची कार वेगात होती आणि तिचा वेग १५० किमीच्या पुढेच असावा असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याच वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. सायरस यांच्या कारचा अपघात सुद्धा अतिवेगामुळेच आणि डिव्हायडरला कार धडकल्याने झाला होता.