फोर्डवर पुन्हा एकदा टाटा मेहेरबान
अमेरिकन दिग्गज ऑटो कंपनी फोर्ड भारतातील व्यवसाय गुंडाळून चालली असून फोर्ड कंपनीवर पुन्हा एकदा टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांनी मेहेरबानी केली आहे. गुजराथ मधील सानंद येथील फोर्डचा उत्पादन प्रकल्प टाटा मोटर्सने खरेदी केला आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड तर्फे हा कारखाना ७२५.७ कोटींना खरेदी केला गेला असून त्याचे अंतिम डील १० जानेवारी २०२३ ला होत आहे. गतवर्षी हा खरेदी करार केला गेला होता. या प्रकल्पाची कार उत्पादन क्षमता ३ लाख युनिटची असून ती ४.२० लाखांवर नेता येणार आहे. फोर्ड इंडियाच्या सर्व कामगारांना जुन्याच अटींवर नोकरीची ऑफर टाटा मोटर्सने दिली आहे. या प्रकल्पात टाटा, इलेक्ट्रिक कार्स उत्पादन करणार आहे.
टाटा ग्रुपने फोर्ड बरोबर केलेला हा दुसरा करार आहे. यापूर्वी मार्च २००८ मध्ये जग्वार लँडरोव्हर टाटा मोटर्सने २.८ अब्जात खरेदी केली होती. २०११ मध्ये फोर्डने भारतात ८ हजार कोटींची गुंतवणूक करून गुजराथ मध्ये उप्तादन प्रकल्प सुरु केला होता पण १० वर्षात भारतीय बाजारात २ अब्जाचे नुकसान आल्यावर त्यांनी हा प्रकल्प विकून भारतातून व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला. आता याच प्रकल्पाची खरेदी टाटानी केली आहे.
फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी १९९९ मध्ये टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांचा पाणउतारा केला होता. त्यावेळी टाटा मोटर्सची इंडिका कार बाजारात फेल गेली होती. तेव्हा रतन टाटा यांनी फोर्ड समुहाला इंडिका विकून टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा फोर्ड यांनी ,’ प्रवासी कारचा अनुभव नसताना कशाला तयार केली, तुमचा कार व्यवसाय विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करणार आहोत’ असे उदगार काढले होते. त्यानंतर रतन टाटा यांनी कार व्यवसाय विक्रीचा निर्णय रद्द केला आणि टाटा मोटर्सला नवी उंची देऊन अनेक बेस्ट सेलिंग कार्स बाजारात आणल्या. त्याच काळात फोर्डला नुकसान होऊ लागले होते. तेव्हा फोर्डची जग्वार खरेदी करण्याची ऑफर टाटानी फोर्ड ला दिली. तेव्हा मुंबईत येऊन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना आमच्यावर तुम्ही फार मोठे उपकार करत आहात असे उदगार काढले होते.