अमेरिकेत ओमिक्रोन सुपरव्हेरीयंट एक्सबीबी.१.५ चा धुमाकूळ

गेली तीन वर्षे जगाला वेठीला धरल्यावर थोडा सुस्तावलेला करोना आता पुन्हा दोन्ही बाजूनी जगाला ग्रासू पाहत असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. चीन मध्ये सध्या वेगाने फैलावत असलेल्या बीएफ.७ पेक्षा कितीतरी अधिक पटींनी धोकदायक असलेला एक्सबीबी.१.५ आता अमेरिकेत धुमाकूळ घालू लागला असून गेल्या आठवड्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्या केसेस ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. हे व्हेरीयंट एक्सबीबीच्या तुलनेत ९६ टक्के वेगाने पसरते आणि बीक्यू.१ पेक्षा १२० पट अधिक वेगाने पसरते असून याची बाधा झालेल्या संक्रमिताना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे संक्रमण रोग तज्ञ बीएफ.७ पेक्षा या नव्या व्हेरीयंट मुळे चिंतेत आहेत.

या व्हेरीयंटला सुपरव्हेरीयंट मानले गेले आहे. आतापर्यंत आलेल्या ओमिक्रोनच्या सर्व व्हेरीयंट मध्ये हे सर्वाधिक धोकादायक व्हेरीयंट मानले जात आहे. रॉयटर्सच्या रिपोर्ट नुसार अमेरिकेत करोना संक्रमिताच्या मध्ये एक्सबीबी, एक्सबीबी.१.५ केसेस ४४ टक्के आहेत. सिंगापूर, भारतासह अन्य ३४ देशात याचा फैलाव झाला असून भारतातील पहिली केस गुजराथ मध्ये सापडली आहे. विषाणूतज्ञ एरिक फेगल डिंग यांच्या मते एक्सबीबी.१.५ हा पुढचा मोठा धोका जगासमोर आहे. एकूण चीन मधून बीएफ.७ आणि अमेरिकेतून एक्सबीबी.१.५ असा दुहेरी धोका निर्माण झाला आहे.