२०२२- सरत्या वर्षात घडल्या अश्या विशेष गोष्टी

२०२२ चे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. या सरत्या वर्षात काय काय घडले हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. विशेष म्हणजे नव्या वर्षात भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार याचा पाया या वर्षात घातला गेला. जगात या वर्षात १३ कोटीहून अधिक बालके जन्माला आली आणि त्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त बाळे एकट्या भारतात जन्माला आली. संयुक्त राष्ट्रसंघाने भारतातील हा जन्मदर पाहूनच १४ एप्रिल २०२३ रोजी भारत चीनला मागे सारून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

लठ्ठपणात नाऊरु या देशाने बाजी मारली असून २०२२ मध्ये या देशात लठ्ठपण ६१ टक्क्यांनी वाढले आहे. या यादीत भारत १८७ नंबरवर आहे. आपल्याकडे ओबेस तरुणांचे प्रमाण ३.९ टक्के आहे. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशननुअर २०३० पर्यंत जगात प्रत्येक ५ महिलांमागे एक तर प्रत्येक सात पुरुषांमागे एक लठ्ठ असेल.

या वर्षात सर्वाधिक कार्स बनविण्याचा विक्रम टोयोटोने केला असून त्यांनी १ कोटी कार्स उत्पादित केल्या, भारतात गेली पाच वर्षे सर्वाधिक कार्स बनविण्याचा विक्रम मारुती सुझुकीच्या नावावर आहे. मारुतीने ८२ लाख कार्स उत्पादित केल्या. जायंट कंपनीने सर्वाधिक सायकल उत्पादन केले. ही कंपनी दरवर्षी ७० लाख सायकली बनविते. भारतात विकल्या गेलेल्या सायकल मधील ४० टक्के सायकली हिरो कंपनीच्या होत्या. हिरो दरवर्षी ५० लाख सायकली बनविते.

आरईएलएक्स ग्रुप जगातील मोठे पब्लीशिंग हाउस आहे. येथे वर्षाला ४.२० लाखाहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. बुक मार्केटच्या रिपोर्ट नुसार २०१६ पासून भारत पुस्तक प्रकाशनात ६ व्या स्थानी आहे तर इंग्रजी पुस्तके प्रकाशनात दुसऱ्या स्थानी आहे. युएनच्या अहवालानुसार या वर्षात ब्राझीलच्या अमेझोन जंगलात सर्वाधिक वृक्ष तोड झाली.४८ लाख एकरावरील वृक्ष तोडले गेले. याउलट भारतात १५४० चौरस किलोमीटर जंगल वाढले आहे.

इंटरनेट युजर्स चीन मध्ये सर्वाधिक म्हणजे १०२ कोटीवर गेले तर भारतात ही संख्या ६५ कोटींवर गेली. २०२२ मध्ये भारतात आयपीएल, कोविन, फिफा वर्ल्ड कप, आशिया कप, आयसीसी टी २० वर्ल्ड कप वर सर्वाधिक सर्च केला गेला. स्टेटीसाच्या रिपोर्ट नुसार डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये भारत अग्रणी राहिला. देशात या वर्षात ७६ हजार कोटी वेळा डिजिटल ट्रान्झॅक्शन केली गेली. चीन मध्ये हे प्रमाण २ हजार कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शन असे राहिले.