शतायुषी हिराबा मोदी यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (वय १००) यांचे शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. पंतप्रधान मोदी सकाळी साडेसातच्या सुमारास अहमदाबाद येथे पोहोचले आणि त्यांनी थेट रायसन तेथील निवासस्थानाकडे प्रयाण केले. त्यानंतर हिराबेन यांच्या पार्थिवाला त्यांनी शववाहिकेपर्यंत खांदा दिला आणि ते स्वतः शववाहिकेतून गेले. सकाळी हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.

हिराबेन या हिराबा नावाने ओळखल्या जात होत्या. मंगळवारी त्यांची तब्येत थोडी बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील यु एन मेहता इंस्टीट्युट ऑफ कार्डीओ अँड रिसर्च हॉस्पीटल मध्ये भरती केले गेले होते. तेथे पंतप्रधानांनी आईची बुधवारी सायंकाळी भेट घेतली होती आणि डॉक्टरांकडे आईची तब्येत आणि उपचार याबंद्दल चौकशी केली होती. हिराबा यांच्या अंतिम समयी मोदींचे मोठे बंधू सोमाभाई त्यांच्या जवळ होते.

शुक्रवारी आईच्या निधनाची खबर मिळताच सकाळी सहा वाजता मोदींनी ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात,’ शानदार शताब्दी का ईश्वर चरणो में विराम. आई मध्ये मी नेहमी त्या त्रिमुर्तीची अनुभूती घेतली आहे, ज्यात एका तपस्व्याचा प्रवास, निष्काम कर्मयोग्याचे प्रतिक आणि जीवनमूल्यांबाबतचे प्रतिबद्ध जीवन यांचा समावेश आहे. मी १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, काम करो बुद्धीसे, जीवन जियो शुद्धीसे.’

हिराबा, पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज यांच्या सोबत गांधीनगर जवळ रायसन या गावी राहत होत्या. मोदी जेव्हा जेव्हा गुजराथ भेटीवर येत असत, तेव्हा तेव्हा आईची भेट घेत असत. हिराबा यांच्या निधनाबद्दल मोदींचे सर्व सहकारी, मंत्री, अन्य राजकिय नेते यांनी शोक व्यक्त केला आहे.