या देशात शस्त्रक्रियेपूर्वी सर्जन करतात ईश्वर प्रार्थना

रुग्ण अगदी गंभीर परिस्थितीत असेल किंवा एखादी अगदी अवघड शस्त्रक्रिया करायची असेल तर डॉक्टर अनेकदा रुग्ण आणि नातेवाईकांना देवाची प्रार्थना करा असा सल्ला देताना दिसतात. अवघड दुखण्यातून बरा झालेला रुग्ण हा ईश्वरी चमत्कार मानला जातो हेही नवे नाही. मात्र एक असाही देश आहे जेथे डॉक्टर स्वतःच्या क्षमतेपेक्षा ‘भगवान भरोसे’ शस्त्रक्रिया करतात. हे ऐकून थोडे विचित्र वाटेल पण विकसित देशांच्या यादीत असलेल्या स्वित्झर्लंड मध्ये आजही अशी प्रथा पाळली जाते.

अनेक हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी देवाची खास प्रार्थना करतात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो, त्याला जास्त रक्तस्त्राव होत नाही असे मानले जाते. हा हिलिंग फॉर्म्युला मध्ययुगीन काळापासून वापरत असून त्यावर अनेक संशोधने झाली आहेत. या प्रार्थनेला ‘ द सिक्रेट’ नावाने संबोधले जाते.

असे म्हणतात पूर्वी मॉंक म्हणजे साधू औषधे देऊन रुग्णावर उपचार करत असत आणि रुग्ण बरा झाला तर तो ईश्वरी चमत्कार मानला जात असे. या पद्धतीवर बराच रिसर्च केला गेला त्यात ७६ टक्के लोकांचा या प्रार्थनेवर विश्वास असल्याचे आणि ती केल्याने रुग्णाला कमी रक्तस्त्राव होतो अशी भावना असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक रुग्ण डॉक्टर्सना शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अशी प्रार्थना करण्याची विनंती करतात. विशेष म्हणजे युनेस्कोने या पद्धतीला जागतिक वारसा म्हणून स्वीकारले आहे.