देशात कुठेही असा, करू शकाल मतदान

शहरी भाग आणि तरुणाई यांच्यात असलेला मतदानाचा निरुत्साह कमी करणे आणि सर्व नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोग रिमोट एव्हीएमच्या प्रोटोटाईपची चाचणी करत आहे.१६ जानेवारीला होणाऱ्या या चाचणीसाठी देशातील सर्व आठ राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि ५८ प्रादेशिक पक्षांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. या चाचणीच्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते.

अनेकदा निवडणुकांसाठी मतदान होत असताना मतदार काही कारणांनी आपल्या मतदान क्षेत्रात नसतात.अश्यावेळी त्यांना मतदान करता येत नाही. नव्या रिमोट ईव्हीएम मुळे ही अडचण दूर होणार आहे आणि मतदार देशात जेथे असतील तेथून आपल्या मतदारसंघात मतदान करू शकतील. या आरव्हीएम ला एकावेळी ७२ मतदार संघ जोडणे शक्य आहे. विशेष म्हणजे यात मतदान मशीन इंटरनेटने जोडण्याची गरज नाही.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरव्हीएम सध्याच्या ईव्हीएमवर आधारित एका मजबूत, फेलप्रुफ व कुशल स्टँड अलोन सिस्टीम रुपात विकसित केले गेले आहे. त्यामुळे एकाच रिमोट पोलिंग बूथ मधून ७२ मतदारसंघात मतदान करता येणार आहे. शहरी मतदार आणि युवा मतदानाबाबत उदासीन असतात त्यासाठी हा उपाय परिवर्तनकारी ठरू शकेल असा दावा केला जात आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी या संदर्भात म्हणाले, मतदारांना मतदान करण्याचा हक्क कुठूनही बजावता यावा यासाठीचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबित होता पण त्यावर उपाय सापडत नव्हता. आता हा नवा उपाय दृष्टीक्षेपात आला आहे. अर्थात पुरेश्या चाचण्या आणि त्याची विश्वासार्हता सिद्ध झाल्यवर त्या संदर्भात कायदा करून तो अमलात आणणे शक्य होणार आहे.