धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत शुक्रवारी सकाळी दिल्ली कडून रुरकी या आपल्या गावी कार मधून जात असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीला हलविले जात असल्याचे वृत्त आहे. ऋषभच्या पाठीला, डोक्याला, पायाला जखमा झाल्या असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असेही सांगितले जात आहे. ऋषभ त्याच्या बीएमडब्ल्यू कार मधून रुरकीला जात असताना नारसन सीमेवर हम्माद्पूर जवळील वळणावर त्यांचे कार वरचे नियंत्रण सुटले आणि कार प्रथम डिव्हायडरला धडकली आणि नंतर तिने पेट घेतला.
यावेळी तेथे काही लोकांनी अपघात पाहून पोलिसांना खबर दिली. कारच्या काचा फोडून ऋषभ याला कार बाहेर काढले गेले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणण्यापूर्वी कार पूर्ण जळून गेली. सुरवातीला ऋषभला जवळच्या सक्षम हॉस्पिटल मध्ये हलविले गेले पण नंतर जखमाचे स्वरूप लक्षात घेऊन डेहराडून येथे नेले गेले.
ऋषभ दिल्लीहून रुरकी कडे घरी चालला होता. त्याला नववर्षाचे सेलेब्रेशन कुटुंबियांसमवेत करायचे होते. त्यामुळे आईला सरप्राईज देण्यासाठी तो निघाला होता. २५ वर्षीय ऋषभ एकटाच गाडीत होता. पहाटे पाच च्या सुमारास त्याच्या गाडीला अपघात झाला. या वेळी धुके होते आणि कदाचित ऋषभच्या डोळ्यावर झापड आली असावी आणि त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.