करोनाने काढले चीनचे दिवाळे?
करोनाने चीन मध्ये कहर करतानाच देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांना पगार मिळालेले नाहीत आणि त्यामुळे करोना साठी औषधे घेण्यास सुद्धा पैसे शिल्लक नाहीत अशी अनेकांवर वेळ आली आहे. औषध दुकानातून औषधांसाठी लोक अक्षरशः भिक मागत असल्याचे आणि शहराशहरातून पगार द्या यासाठी निदर्शने केली जात असल्याचे व्हीडीओ सोशल मिडीयावर येत आहेत.
२४७ चायना न्यूजने ट्विटरवर असे व्हिडीओ शेअर केले आहेत, चीनवरचे आर्थिक संकट अधिक गंभीर झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत. झिरो कोविड धोरणामुळे अगोदरच देशाची आर्थिक उलाढाल खूपच मंदावली असून त्यामुळे महसूल घटला आहे. बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट (बीआयएस)च्या नव्या रिपोर्ट नुसार चीनचे गैरवित्तीय क्षेत्रातील कर्ज ५१.८७ ट्रिलीयन डॉलर्स वर गेले असून ते जीडीपी पेक्षा २९५ टक्के जास्त आहे. १९९५ नंतर इतके कर्ज देशावर कधीच नव्हते.
बीजिंग थिंक टँक नॅशनल इस्टीटयूट ऑफ फायनान्स अँड डेव्हलपमेंट नुसार २०२० अखेर चीनच्या कर्जाने उच्च पातळी गाठली आहे आणि या परिस्थितीत नजीकच्या काळात सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यातच देशाची लोकसंख्या घटत असल्याने सामाजिक सुरक्षेवरचा सरकारचा खर्च वाढता राहणार आहे.