प्रचंड थंडीने गोठला जगप्रसिद्ध नायगरा धबधबा

अमेरिकेत हिमवादळामुळे सध्या थंडीची प्रचंड लाट आली असून त्यामुळे जगप्रसिद्ध नायगारा धबधबा सुद्धा बराचसा गोठला आहे. हिमवादळामुळे अमेरिकेचा बराचसा प्रदेश बर्फाने झाकला गेला आहे. नायगारा नदीचे पाणी पूर्ण गोठले असून काही ठिकाणी त्यावरून सहज चालत जात येईल इतके बर्फ घट्ट बनले आहे. मात्र मुळातच या नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने यातून थोडे पाणी वाहते. पर्यटकांनी या भागात गर्दी केली असली तरी त्यांना नदीत उतरू नये, धबधब्यापासून दूर अंतरावर राहा असे इशारे दिले जात आहेत.

हिमवादळामुळे हा संपूर्ण प्रदेश विंटर वंडरलँड बनला आहे. न्यूयॉर्क, ओंतारियो आणि कॅनडा सीमेवर, बफेलो शहरापासून ४० किमी नायगारा प्रदेश आहे आणि याच भागाला बर्फवृष्टींचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. हाडे फोडणारी थंडी आहे आणि तरीही पर्यटक सोशल मिडीयावर येथील फोटो शेअर करत आहेत. येथील तापमान उणे ५२ डिग्रीवर गेले असून न्यूयॉर्क मध्ये आतापर्यंत २८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

नायगारा धबधब्यातून दर सेकंदाला ३१६० टन पाणी, प्रती सेकंद ३२ फुट उंचीने कोसळते. नऊ वर्षांपूर्वी या धबधब्याचे पाणी हवेतच बर्फ होत होते. इतिहासात सातव्या वेळी नायगारा गोठल्याची नोंद झाली असून यापूर्वी १८४८, १९११, १९१२, १९१७,२०१४ मध्ये नायगारा गोठला होता.