निर्बंध न लादता कोविड नियंत्रणावर सरकारचा भर

जगात पुन्हा एकदा करोना विषाणूचा फैलाव अतिशय वेगाने होऊ लागला आहे. भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन सतत मार्गदर्शक सूचना देण्याचे काम सुरु केले आहे. पण तूर्तास तरी कोणतेही कडक निर्बंध लागू न करता करोना नियंत्रणावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आंतरराष्टीय प्रवासावर बंदी घातली जाणार नाही पण चीन, जपान, कोरिया, हॉंगकॉंग, सिंगापूर व अन्य काही देशामधून येणाऱ्या प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म आणि आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे आणि करोना नियंत्रणात राखता येईल अशी आशा व्यक्त केली आहे.

भारतात ओमिक्रोनच्या सर्व व्हेरीयंटवर करोना लस प्रभावी ठरली आहे. नागरिकांमध्ये हायब्रीड इम्युनिटी पुरेश्या प्रमाणात दिसते आहे. तरीही काही आणीबाणी परिस्थिती आलीच तर त्यातून निपटण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे असे आरोग्य विभागाकडून सांगितले गेले आहे.

करोनापासून बचावासाठी मास्क हे सर्वात मोठे हत्यार असले तरी मास्क वापर अजून बंधनकारक केला गेलेला नाही. ओमिक्रोनचा बीएफ .७ व्हेरीयंट अतिशय वेगाने फैलावणारा आहे आणि एका व्यक्तीपासून १६ जणांना संक्रमित करण्याची त्याची क्षमता आहे. भारतात करोनाचे २२० प्रकारचे व्हेरीयंट येऊन गेल्याचे सांगितले जात आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भारतात करोनाची चौथी लाट येण्याचा धोका आहे त्यामुळे या काळात नागरिकांनी पुरेशी दक्षता घ्यावी असा सल्ला दिल्लीच्या एम्सचे माजी प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे. ते म्हणजे आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर पूर्व आशियात कोविड आला कि ३० ते ३५ दिवसांनी तो भारतात नवी लाट आणत आहे. या आधारावर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दक्षता घेण्याचा सल्ला दिला गेला आहे.