उंदीरमामा विषयी मनोरंजक माहिती

आपल्याकडे आपले लाडके दैवत गणपतीबाप्पाचे वाहन उंदीर आहे आणि त्यामुळे कदाचित त्याला मराठी भाषेत मामाचा दर्जा दिला गेला असावा. उंदीरमामा असा या प्राण्याच्या उल्लेख बालगीतापासून अनेक ठिकाणी येतो. या उंदीरमामा विषयीची मनोरंजक माहिती येथे देत आहोत. हा चिमुकला प्राणी किती बुद्धिमान आहे हे त्यावरून कळेलच पण उपद्रवी आणि धोकादायक आहे यांचीही कल्पना येईल.

विविध प्रयोगांसाठी वैज्ञानिक प्रयोगशाळेत अनेक प्राणी वापरतात पण त्यात सर्वाधिक वापर उंदरांचा होतो. २०० वर्षांपासून उंदरावर प्रयोग सुरु आहेत. सर्वप्रथम अन्नाची कमतरता आणि ऑक्सिजनची कमतरता मानवी शरीरावर काय परिणाम करते हे जाणून घेण्यासाठी उंदरावर प्रयोग केले गेले. ३० नोबेल विजेत्यांनी त्यांच्या शोधात उंदरांचा वापर केला. याचे कारण म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, वातावरणात उंदीर स्वतःला लवकर अॅडजस्ट करून घेतात आणि त्यांच्या मेंदूची रचना आणि काम करण्याची पद्धत मानवाच्या मेंदूसारखी आहे. या मुळेच विविध औषधे, ड्रग्सचे परिणाम प्रथम उंदरावर आजमावले जातात.

उंदराचे आयुष्य फार तर दोन वर्षे असते. पण उंदीर असतो बुद्धिमान. त्याच्यापुढे साधे पाणी आणि अमली पदार्थ मिश्रित पाणी ठेवले तर तो अमली पदार्थ मिश्रित पाण्याला पसंती देतो. येथेही त्याचे माणसाशी साम्य दिसते. उंदीर सलग तीन दिवस पोहू शकतात आणि तीन मिनिटे श्वास रोखून धरू शकतात. टॉयलेट मध्ये उंदीर आहे म्हणून टॉयलेट फ्लश केले तरी ते जिवंत राहतात आणि ज्या मार्गाने आत आले होते त्याच मार्गाने परत आत येतात कारण त्यांची आठवण फार पक्की असते.

उंदराचे डोळे थोडे कमजोर असले तरी वास घेण्याची आणि स्वाद घेण्याची क्षमता खूप असते. त्यामुळेच उंदीर मारायचे औषध घातले असेल तर ते त्या पदार्थाचा थोडा स्वाद घेऊन ती चव जन्मभर लक्षात ठेवतात. फ्रांसने १९६१ मध्ये अंतराळात उंदीर पाठवला होता. उंदीर पाचव्या  मजल्यावरून खाली पडला तरी जखमी होत नाही आणि मांजराप्रमाणे समुद्राचे पाणी पिऊ शकतो. पाण्याविना उंदीर उंटापेक्षा जास्त काळ राहू शकतो.उंदराची प्रजनन क्षमता जबरदस्त आहे. १८ महिन्यात २ लाख वंशज तो पैदा करू शकतो यामुळेच जगातून उंदरांचे समूळ उच्चाटन शक्य नाही.

उंदराला घाम येत नाही. विषाणूमुळे येणाऱ्या तापापासून प्लेग पर्यंत ३५ प्रकारचे रोग उंदरामुळे होऊ शकतात. जगातला सर्वात मोठा उंदीर लहान कुत्र्याच्या आकाराचा आहे. उंदराला काही शिकवले तर ते लक्षात ठेवतात यामुळेच भूसुरुंग शोधण्यासाठी प्रशिक्षित उंदीर सुद्धा वापरले जातात. माणसाप्रमाणेच उंदरांना सुद्धा गुदगुल्या होतात आणि ते हसतात. आनंद झाला कि त्यांचे डोळे फडफडतात. कॅनडाच्या आल्बर्टा शहरात एकही उंदीर नाही. म्हणजे दरवर्षी कसे कोण जाणे पण १२ उंदीर या शहरात येतात पण त्यांना लक्ष ठेऊन ताबडतोब यमसदनी पाठविले जाते असे म्हणतात. उंदीर सर्व वस्तू कुरतडतात कारण त्याचे दात वाढत असतात. हे दात मर्यादित लांबीचे राहावे म्हणून उंदीर तारा, लाकूड, कापड अश्या सर्व वस्तू कुरतडून दात त्यावर घासून कमी करतात.