१०२ मुलांना जन्माला घातल्यावर आता करतोय कुटुंब नियोजन

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकून एक नंबरवर येत आहे. त्यामुळे अनेक सामाजिक, राजकीय वादविवादाना तोंड फुटले आहे. पण आफ्रिकेत अशीही एक व्यक्ती आहे जिने जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून नाव कमावले आहे. आफ्रिकेतील युगांडाचा मुसा हसाहया या माणसाला तब्बल १२ बायका आहेत आणि त्यांच्यापासून त्याला १०२ मुले झाली आहेत. हे सर्व कुटुंब एका घरात राहते. कारण मग त्यामुळे मुसा बायकांवर लक्ष ठेऊ शकतो. पण आता मुसाला या अवाढव्य कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड होऊ लागल्याने त्याने त्यांच्या बायकांना कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात जुंपले असून सर्व बायकांनी गर्भनिरोधक गोळ्या घ्या असे फर्मान काढले आहे.

मुसा शेतकरी आहे. आफ्रिकेत बहुपत्नीत्व मान्य आहे. मुसा लुसाका शहराजवळ बुमिया गावी १२ बेडरूम्सच्या घरात राहतो. अनेक पत्नी करायला परवानगी असल्याने मुसाने वयाच्या १६ व्या वर्षापासून एकामागोमाग एक लग्ने करण्याचा सपाटा लावला होता. आता तो ६७ वर्षाचा आहे. त्याच्या १०२ मुलांपैकी ११, सर्वात लहान बायको जुलैका हिची आहेत. ही जुलैका मुसाच्या सर्वात मोठा मुलापेक्षा २१ वर्षांनी लहान आहे. मुसाची १/३ मुले सहा ते ५१ वर्षगटातील आहेत. इतकेच नाही तर मुसाला ५६८ नातवंडे आहेत.

डेली स्टारच्या बातमीनुसार मुसा आर्थिक तंगीने परेशान आहे. त्याची सर्व मुले शेतीकाम करतात पण सर्वाना पुरेल इतके उत्पन्न त्यातून मिळत नाही. मुसाच्या दोन बायका गरिबीला कंटाळून त्याला सोडून गेल्या आहेत. त्यामुळे मुसा बाकीच्या बायकांना आता आपल्याला मुले नकोत म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घ्या असे सांगतो आहे. या देशात कुटुंब नियोजन करणे चांगली प्रथा मानले जात नाही. पण मुसा अन्य लोकांना सल्ला देताना ४-४ बायका करू नका असा सल्ला देऊ लागला आहे.