रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी दोघांचा आज जन्मदिवस

२८ डिसेंबर हा दिवस देशासाठी खास आहे कारण याच दिवशी देशातील दोन बड्या उद्योजकांचा जन्म झाला आहे. टाटा समूहाचे रतन टाटा आज ८५ वर्षाचे झाले तर धीरूभाई अंबानी आज असते तर ९० वर्षांचे असते. विशेष म्हणजे या दोघांनी त्यांचे व्यवसाय आकाशाच्या उंचीला नेऊन पोहोचविले आहेत. त्यामागे त्यांची काही खास गुपिते आणि विचार आहेत.

कपडे उद्योगापासून सुरुवात केलेल्या धीरूभाई यांनी आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतेक सर्व क्षेत्रात उद्योग विस्तार केला आहे. सकाळाचा नाश्ता ते रात्री बिन्झ वॉच असा हा विस्तार आहे तर रतन टाटा यांनी त्यांना वारसा म्हणून मिळालेल्या उद्योगात गगन भरारी घेतली आहे. मजबूत स्टील पासून मीठ आणि रस्ते प्रवास वाहनांपासून विमान कंपनी असा हा प्रवास आहे. १९५० मध्ये टाटा समूहाच्या हातून सरकारने घेतलेली एअर इंडिया परत टाटा समुहात आणणे, फोर्डच्या जग्वारची खरेदी, टेटली या जगातील सर्वात मोठ्या चहा उत्पादन कंपनीचे अधिग्रहण आणि युरोप स्टील उत्पादक कोरस चे अधिग्रहण असा हा चढता आलेख आहे.

या दोन्हा उद्योजकांची यशाची काही गुपिते आहेत. धीरूभाई अंबानी यांच्या मते, जे स्वप्न पाहण्याची हिम्मत करतात ते जग जिंकू शकतात. तुमचे स्वप्न पूर्ण झाले नाही तर दुसरा कुणी तुम्हाला नोकरीवर ठेऊन त्याचे स्वप्न पूर्ण करतो. गरीब म्हणून जन्माला येण्यात तुमची चूक नाही पण गरीब म्हणून मरणे ही तुमचीच चूक आहे. काही कमवायचे असेल तर धोका पत्करावा लागतो तेव्हा यश मिळते. मोठा विचार, जलद विचार, पुढचा विचार करा कारण विचारावर कुणा एकाचाच कधीच हक्क नसतो.

रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार कंपनीतील महत्वाच्या बाबी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही प्रथम कर्मचारी म्हणून काम केले पाहिजे. जे तुमच्यावर दगड मारतील त्याचा उपयोग स्मारक बनविण्यासाठी करा. तुम्हाला वेगाने वाटचाल करायची असेल तर एकटे चालले पाहिजे पण दीर्घकाळ वाटचाल करायची असेल तर सर्वाना सोबत घेऊन चालले पाहिजे. मी योग्य निर्णय यावर विश्वास ठेवत नाही तर अगोदर निर्णय घ्या आणि तोच योग्य होता हे सिद्ध करा. कुणाही व्यक्तीचे नुकसान त्याच्या स्वतःच्या मनधारणेमुळे होत असते अन्य कुणी तुमचे नुकसान करू शकत नाही.