सल्लू भैयाच्या  ५७ वर्षाच्या आयुष्यातील काही गुपिते

बॉलीवूडचा दबंग खान, गॉडफादर अशी ओळख असलेला सलमान खान २७ डिसेंबरला वयाची ५७ वर्षे पूर्ण करत आहे. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९६५ साली झाला आणि तो सलीम यांच्या घरातला मोठा मुलगा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान याच्याबाबत काही फारशी माहिती नसलेली गुपिते त्याच्या चाहत्यांसाठी देत आहोत.

सलमानचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम सलमानखान असे असून त्याच्या नावात आजोबा आणि वडिलांच्या नावाचा समावेश आहे. त्याचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. वडिलांच्या नावाचा उपयोग त्याने काम मिळविण्यासाठी कधीच केला नाही. संघर्ष करूनच त्याने बॉलीवूड मध्ये स्वतःचा जम बसविला आहे.सलमानचा पहिला चित्रपट मैने प्यार किया हा नसून बीबी हो तो ऐसी हा आहे. अर्थात त्यात तो सपोर्टिंग रोल मध्ये होता आणि प्रत्यक्षात त्यावेळी तो दिग्दर्शकाचे काम मागण्यासाठी गेला असताना त्याला रोल ऑफर झाला होता. त्याने फलक नावाच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले पण या चित्रपटाची चर्चा फारशी झालीच नाही.

मैने प्यार किया या गाजलेल्या चित्रपटाच्या वेळी सुरज बडज्यात्या यांच्या मनात सलमान बरोबर अन्य दोघांची नावे होती पण शेवटी त्यांनी सलमानलाच संधी दिली. त्यानंतर त्याला ब्लॉक ब्लस्टर ठरलेला बाजीगर ऑफर झाला होता पण निगेटिव्ह रोल असल्याने त्याने तो चित्रपट नाकारला आणि शाहरुखची लॉटरी लागून शाहरुख सुपर स्टार बनला. सलमानच्या हातात त्याच्या वडिलांनी दिलेले निळ्या रंगाचे ब्रेसलेट नेहमी असते आणि तो त्याचा लकी चार्म आहे.

सलमानला पेंटिंगची आवड आहे त्यांचे एक पेंटिंग आमीर खानने विकत घेतले होते. सलमानला गाण्याचे अंग आहे आणि तो गाणी छान म्हणतो. त्याला लेखनाची आवड आहे. बागी, चंद्रमुखी आणि वीर या कथा सलमानने लिहिल्याचे सांगतात. बॉलीवूड मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सर्वाधिक वेळा सलमानने भूमिका केल्या आहेत. दबंग चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये सोनू सूदच्या नाकावर सलमानने खरोखरच जोरदार पंच मारला आणि त्यामुळे सोनूचे नाक मोडले होते. त्यावेळी सलमानने त्याची माफी मागितली होती.