प्रियांका वाड्रा २०२४ च्या लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार

प्रियांका गांधी वाड्रा आता राजकारणात खऱ्या अर्थाने उतरत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करणार आहेत. गांधी घराण्याची सुरक्षित जागा रायबरेली मधून त्या निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले गेले असून सध्या सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस खास तयारीत असून त्यासाठी काही योजना आखल्या जात आहेत. या वेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या जाणार असून राहुल गांधी यांच्याकडे दक्षिण भारताची तर प्रियांका कडे उत्तर भारताची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नव्या वर्षात उत्तर प्रदेशात येत असून तेथे तीन दिवस ही यात्रा असेल. प्रियांका या यात्रेत सामील होणार आहेत.

हिमाचल प्रदेश निवडणुकात प्रियांका यांनी कॉंग्रेससाठी जोरदार प्रचार अभियान चालविले होते आणि त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जबाबदारी या बहिण भावात वाटून दिली जाणार आहे. राहुल पुन्हा एकदा केरलच्या वायनाड येथून निवडणूक लढवितील असे समजते. उत्तर प्रदेशात राहुल प्रचारासाठी येतील पण मुख्य धुरा प्रियांका यांच्याकडे असेल. कॉंग्रेसने यावेळी उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रियांका दिल्ली आणि लखनौ अश्या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करून भाजपची रणनीती उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत . विधानसभा निवडणुकात प्रियांका उत्तर प्रदेशातच काम करत होत्या पण त्यावेळी त्यांना फारसे यश मिळाले नव्हते.