१४ एप्रिल २०२३, चीनला पछाडून भारत बनणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश

२०२२ला निरोप देण्याची वेळ आणि २०२३ या नव्या वर्षाची चाहूल लागली असतानाच नवे वर्ष भारतासाठी खास ‘शिरपेच’ घेऊन येत आहे. या दिवशी भारत चीनला पछाडून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे. ३०० वर्षात प्रथमच चीन सर्वाधिक लोकसंख्येचा देश हा शिरपेच गमावणार आहे.

इतिहास सांगतो, इसवी सन पूर्व १० हजार म्हणजे १२ हजार वर्षापूर्वी जगाची सर्वाधिक लोकसंख्या मेक्सिको मध्ये होती. मग सात हजार वर्षापूर्वी चीनने मेक्सिकोला मागे टाकत हा बहुमान मिळविला आणि ६ हजार वर्षापूर्वी हा बहुमान भारताकडे आला. त्यानंतर १८ व्या शतकापर्यंत भारतच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता. पण याच शतकात चीनने भारताला पुन्हा मागे टाकले होते. आता ३०० वर्षानंतर पुन्हा एकदा १४ एप्रिल २०२३ ला भारत चीनला मागे टाकणार आहे. या वर्षात भारताची लोकसंख्या १४३ कोटी तर चीनची १४२ कोटी असेल असे म्हटले जात आहे. २०५० मध्ये भारताची लोकसंख्या १६७ कोटींवर तर चीनची १३१ कोटींवर जाईल आणि २१०० साली भारताची लोकसंख्या १५३ कोटी तर चीनची फक्त ७६.६ कोटींवर येईल असे सेफोलॉजी तज्ञ सांगत आहेत.

आकडेवारीनुसार १९८३ मध्ये चीनचा लोकसंख्या वाढीचा दर १.१ टक्के होता तर २०२२ मध्ये तो ०.०१ टक्क्यावर आला. भारताची लोकसंख्या आजही ०.७ टक्के दराने वाढते आहे. हा दर उणे होण्यास ४० वर्षे लागणार आहेत. याचा अर्थ एप्रिल मध्ये जगातील प्रत्येक पाच माणसांमागे एक भारतीय असेल. लोकसंख्या वाढीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. पण जगात बौद्धिक संपदा, काम करू शकणारा कर्मचारी आणि तरुणवर्ग सर्वाधिक प्रमाणात भारतातच तयार होणार आहे हा मोठा फायदा आहे.