शाहरुखच्या ‘पठाण’च्या हक्कासाठी ओटीटीवर मिळाले १०० कोटी

प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शाहरुख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे हक्क ओटीटी साठी अमेझोन प्राईमने १०० कोटींना खरेदी केल्याचे वृत्त असून मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरवातीला हा चित्रपट ओटीटीवर येईल असे समजते. पठाणचे रिलीज वादात आले आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होत आहे. पण त्यापूर्वी टीझर मध्ये दीपिका पदुकोनचा भगव्या बिकिनी मधल्या बेशरम रंग गाण्याने वादाची धूळ उडवून दिली असून हिंदू संघटनांनी या गाण्यावर आणि भगव्या बिकिनीवर आक्षेप घेतला आहे. गाणे बदलले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला गेला आहे.

शाहरुखचे चार वर्षांच्या गॅप नंतर रुपेरी पडद्यावर लीड रोल मध्ये पुनरागमन होत आहे. त्याचे चाहते त्यांच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. २०१८ मध्ये शाहरुख ‘झिरो’ मध्ये दिसला होता त्यानंतर तो कॅमिओ म्हणून अनेक चित्रपटात दिसला आहे पण लीड रोल मध्ये दिसलेला नाही. पठाण साठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.

या चित्रपटाचे बजेट २५० कोटींचे आहे पण रिलीज पूर्वीच चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपटाचे मिडिया हक्क १०० कोटींना आणि ओटीटी हक्क १०० कोटींना विकले गेले आहेत. चित्रपट रिलीज होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे.