मुसळधार पावसाने मक्का मशिदीत भरले पाणी, पुरात वाहून गेली वाहने

सौदी अरेबियातील इस्लामधर्मियांचे पवित्र स्थळ मक्का येथे गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने अचानक पूर आल्याने अनेक वाहने वाहून गेली आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक वाहने वाहून जात असताना दिसत आहेत. मुख्य रस्ते बंद झाले असून मिडिल इस्ट आय या स्थानिक वृत्तपत्रातील बातमीनुसार मक्का येथे या पावसाने ग्रांड मशिदीत पाणी भरल्याचे आणि अनेक भाविक मुसळधार पावसात भिजत असल्याचे दिसत आहे.

हवामान विभागाने अचानक पूर, वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अब्दुल अजीज विमानतळावर येणाऱ्या भाविकांनी अगोदर उड्डाणाची माहिती करून घ्यावी अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत. पावसाने अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत. शाळा बंद केल्या गेल्या आहेत आणि परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत.

मक्का जवळच्या जेद्दा येथेही मुसळधार पाउस, पूर आणि वादळ असून असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३८२२ कर्मचारी आणि १४९० उपकरणे तैनात केली गेली आहेत. नोव्हेंबर मध्ये जेद्दा येथे रेकॉर्ड पाउस नोंदवला गेला होता आणि त्यामुळे आलेल्या पुरात दोन नागरिक ठार झाले होते. यावर्षी सौदीच्या ताबुक क्षेत्रात तापमान घसरण झाल्याने दुर्लभ बर्फवर्षाव पाहायला मिळाला होता.