बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जागे करण्यासाठी मंदिर, मशिदीतून वाजणार ‘अलार्म’


सीबीएसईसह सर्व राज्यांच्या बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी होणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकार एक अनोखा उपक्रम सुरू करत आहे. याअंतर्गत बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंदिर, मशिदी आणि गुरुद्वारातून ‘अलार्म’ वाजणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांची चांगली तयारी करता येईल. राज्याच्या शिक्षण विभागाने संबंधित शाळा अधिकाऱ्यांना पालकांना त्यांच्या मुलांना सकाळी 4.30 वाजता उठवण्यास सांगावे जेणेकरून मुले सकाळी लवकर बोर्डाच्या परीक्षेची तयारी करू शकतील.

सर्व सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात विभागाने पालक आणि शिक्षकांनी एकत्रित नियोजन करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी काही अतिरिक्त तास मिळावेत, यावर भर दिला आहे. सकाळची वेळ स्वयंअभ्यासासाठी उत्तम आहे. त्यावेळी मन ताजेतवाने राहते आणि वाहनांचा आवाजही येत नाही. यासाठी प्रत्येक वर्गशिक्षकाने पालकांना विनंती करावी की त्यांनी सकाळी 4:30 वाजता मुलांना उठवावे आणि 5:15 पर्यंत अभ्यासासाठी बसण्यास सांगावे. विद्यार्थी जागे आहेत की नाही, अभ्यास करत आहेत की नाही, याचीही शिक्षक व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे चौकशी करणार आहेत. पालक सहकार्य करत नसतील तर शाळा व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून द्यावे.