तरी के एल राहुल ला मिळणार डच्चू – वासिम जाफर


मुंबई: कर्णधार म्हणून विजयी ठरला असला तरीही सलामीचा फलंदाज म्हणून अपयशी ठरलेल्या के एल राहुल याला आगामी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून घरचा रस्ता दाखवला जाईल, असे मत माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी व्यक्त केले आहे.

बांगलादेश विरुद्ध झालेल्या दोन कसोटींच्या मालिकेत कर्णधार म्हणून राहुलने विजय मिळवला. मात्र सलामीवीर फलंदाज म्हणून त्याची कामगिरी सुमार दर्जाची झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा याचे संघात आगमन झाल्यास राहुल याची गच्छंती अटळ असेल, असे वासिमने खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

बांगलादेश विरुद्ध दोन कसोटीच्या चार डावात राहुलने केवळ 22, 23, 10 आणि 2 अशा धावा केल्या आहेत. सन 2022 या वर्षात चार कसोटी सामन्यात राहुलने केवळ 17.13 या सरासरीने 137 धावा केल्या आहेत.

बांगलादेश विरुद्ध झालेल्या मालिकेत फलंदाज म्हणून राहुलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याच्यादृष्टीने ही मालिका तुलनेने सोपी होती. मात्र, राहुल या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. विशेषतः दुसऱ्या कसोटीत केवळ 145 धावांचे मर्यादित आव्हान असताना राहुल आणि शुभमन गिल यांनी स्वीकारलेले बचावाचे धोरण आश्चर्यकारक होते. त्यामुळे बांगलादेशच्या फिरकीपटूंना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली, अशी टीकाही वासिमने केली आहे.

दुसऱ्या कसोटीत आघाडीच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यामुळे बांगलादेश भारतीय संघाविरुद्ध पहिल्या कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी हा सामना खेचून आणला आणि भारताने या मालिकेत निर्भेळ विजय प्राप्त केला.

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाबरोबर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असणार आहे. फलंदाजी मधील अपयशामुळे या मालिकेतून राहुल याला वगळले जाण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.